लोक राज संगठनाच्या महाराष्ट्र प्रादेशिक समितीचे निवेदन, एप्रिल 28, 2018

बंधूभगिनींनो,

छोट्याछोट्या मुलामुलींच्या व महिलांच्या बर्बर बलात्काराविषयी आपण रोजरोज ऐकतो. गायब झालेल्या निरपराध युवकांविषयी व त्यांच्यावर झालेल्या खोट्या खटल्यांमुळे तुरुंगांत खितपत पडलेल्या महिलापुरुषांविषयी आपण रोजच ऐकतो.

अशा गुन्ह्यांपासून राज्यकर्ते लोकांना वाचवत नाहीत. अलिकडे जेव्हा कथुआमध्ये एका लहानग्या मुलीवर बलात्कार झाला होता, तेव्हा जम्मूकाश्मीर सरकारच्या मंत्र्यांनी गुन्हेगारांच्या संरक्षणार्थ निदर्शने संघटित केली होती. उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर जेव्हा बलात्कार झाला होता, तेव्हा गुन्हेगार आमदाराने तिच्या वडिलांचा खून आयोजित केला असताना उत्तरप्रदेशचे सरकार केवळ चुपचाप बघतच बसले.

अधिकाऱ्यांच्या वागणुकीच्या एकदम उलट, आपल्या देशातील लोकांचा क्रोध वाढतच चाललाय. सोशल मीडियावर, मेणबत्ती मोच्र्यांमार्फत व इतर तऱ्हेने ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत. बलात्कारांच्या अलिकडील घटनांनंतर, आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात रोज निषेध घडत आहेत. 20 एप्रिलला भिवंडीमध्ये लोक राज संगठन, जमीयत उलेमा (महाराष्ट्र) व जमातइस्लामी हिंद (भिवंडी) ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आणि एमपीजे (भिवंडी), हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी व सोशालिस्ट यूनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) द्वारे समर्थित मोर्च्यामध्ये ’’एकावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला!’’ ह्यावर भर देत देत 15,000 लोकांनी निदर्शन केले. गुन्हेगारांना साजेशी शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.

देशभरातील संतप्त जनसामुदायिक निषेधांमुळेच सत्ताधारी पार्टीला जम्मूकाश्मीर सरकारातील दोन मंत्र्यांना काढण्यावाचून व उत्तरप्रदेशातील आरोपी आमदाराला अटक करण्यावाचून पर्याय नव्हता.

ह्या पाशवी गुन्ह्यांच्या समर्थनार्थ राज्यकर्ते एकावर एक थापा मारत आहेत. तीव्र सांप्रदायिक फाटाफूट घडवून आणण्याकरता ते कथुआतील घटनेचा वापर करू पाहताहेत.

इतिहासाचे धडे आपल्याला विसरता कामा नये. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत आपण अनेक सांप्रदायिक हत्याकांडे बघितली आहेत. 1984मधील सांप्रदायिक हत्याकांडात तेव्हाच्या सत्ताधारी काँग्रेस पार्टीच्या आदेशावरून शेकडो महिलांवर बलात्कार करण्यात आले व त्यांच्या पुरुष माणसांना ठार मारण्यात आले. 1990च्या दशकात काँग्रेस व भाजपाच्या सहयोगाने धार्मिक द्वेष व भावनोद्रेक पसरवण्यात आला. नंतर बाबरी मशीदीचा विध्वंस करण्यात आला व देशातील अनेक ठिकाणी असंख्य हिंदूमुसलमानांच्या कत्तली करण्यात आल्या. 2002मध्ये गुजरातमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजपाने अगणित महिलांचे बलात्कार व असंख्य पुरुषांचे खून आयोजित केले होते.

हे सर्व महाभयंकर गुन्हे राज्यकर्त्यांनीच आयोजित केले होते. जेव्हाजेव्हा लोक न्यायासाठी संघर्ष करतात तेव्हातेव्हा त्यांना चिरडण्याकरता महिलांना शिकार बनवण्याची राज्यकर्त्यांची घाणेरडी सवयच बनली आहे. काश्मीर, उत्तरपूर्व व इतरत्र असेच घडतेय. अनेक बलात्कार व हत्याकांडे ज्यांनी संघटित केलेली आहेत, ज्यांनी ह्या पाशवी कृत्यांचा पुढाकार केलेला आहे, अशा नेत्यांच्या काँग्रेस व भाजपा सारख्या पार्टीपासून आपण कोणत्या प्रकारच्या न्यायाची अपेक्षा करू शकतो?

मूलभूत समस्या ही आहे की विद्यमान प्रणालीत लोक सत्ताहीन आहेत. आपल्या देशात प्रातिनिधिक लोकशाहीची जी राजनैतिक प्रणाली आहे, ती प्रत्यक्षात बहुसंख्य लोकांना सत्तेपासून दूर ठेवते. अतिश्रीमंतांचे ज्यांना समर्थन असते, अशा पार्टीने उभे केलेले उमेदवार निवडणुका जिंकतात. हे तर उघडच आहे की जिंकल्यावर त्यांना पैसे पुरवणाऱ्यांच्या बरहुकूम वागावे लागते. लोकांचे त्यांच्यावर काहीच नियंत्रण नसते. मतदान करण्यापलिकडे लोकांच्या हातात काहीच नसते. निवडून आलेले प्रतिनिधी लोकांच्याप्रती जबाबदार नसतात. कोण सरकार बनवेल, आणि सरकारने काय केले पाहिजे किंवा काय करायला नको, ह्याच्याविषयी लोकांना विचारलेच जात नाही. सार्वभौमत्व, म्हणजे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार, हा संसदेतील मंत्रीमंडळाच्या हातात संकेंद्रित असतो. लोकांचे म्हणणे लागू होईल ह्याची हमी देणारी कोणतीच यंत्रणा नाहीय.

ह्या प्रणालीतील जी मूलभूत तृटी आहे, तिला आपण दूर केले पाहिजे. आपण राजनैतिक सत्ता लोकांच्या हातात आणली पाहिजे. आपल्या हातात राजनैतिक सत्ता घेऊन आपण लोकं आपली स्वतःची व आपल्या पोराबाळांची सुरक्षा तर सुनिश्चित करू शकूच. शिवाय गरीबी व सन्माननीय मानवजीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक असतं त्याचा अभाव, ह्यांच्यासारख्या समस्या देखील आपण दूर करू शकू.

आपले एकजूट निषेध चालवून आपण गुन्हेगारांना रास्त शिक्षेची मागणी करतच राहिले पाहिजे. त्याचबरोबर लोकांच्या हातात सत्ता आणण्याच्या दिशेने आपण तयारीदेखील करूयात. लोक राज संगठन अगदी हेच करण्यासाठी संघर्षरत आहे.

सर्व लोकांची राजनैतिक एकता बनवण्यासाठी लोक राज संगठन कार्यरत आहे. आम्ही लोकांच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ कृतींसाठी लोकांची एकता बनवण्यासाठी कार्यरत आहोत. दरम्यान आम्ही छोट्याछोट्या मतभेदांना व पाट्र्यांच्या एकमेकांबरोबर ज्या स्पर्धा असतात, त्यांना दूर ठेवतो.

आम्ही सर्व लोकांना आवाहन करतोय की एकजूट होऊया आणि महिला, पुरुष व युवकांविरुद्ध प्रत्येक प्रकारच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर व रास्त शिक्षेची जोरदार मागणी करूया.

पोलिसांत असो किंवा इतर सुरक्षाबलांत, वर्दीतील सर्व महिलापुरुषांना आम्ही आवाहन करतो, की आमच्या मुलीमुलांचे रक्षण करा. शेवटी तुम्हीदेखील कामगारशेतकऱ्यांचीच तर मुले आहात. ज्यांच्यावर हल्ले केले जात आहेत ते अगदी तुमच्याच पोराबाळांसारखे आहेत. आम्हाला ठाऊक आहे की खोलवर तुमच्या मनातदेखील ह्या अन्याय्य प्रणालीच्या बद्दल क्रोध आहे, जिच्यात राज्यकर्ते उघडउघड मुलीमुलांचे बलात्कार व खून करतात.

आपल्याला सुरक्षित, सन्माननीय जीवन लाभेल ह्याची हमी मिळण्यासाठी चला, आपण सर्व एकजुटीने लोकांच्या हातात राजनैतिक सत्ता आणण्यासाठी काम करूया!

By admin